बारामती | निंबुत येथे एसीबीची कारवाई; सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना खासगी इसम रंगेहाथ पकडला

 पुरंदर रिपोर्टर Live

बारामती | निंबुत 

        बारामती तालुक्यातील निंबुत येथे प्लॉटच्या सातबारा उताऱ्यावर नोंद लावून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सोमनाथ संपत महानवर (वय ३५, रा. गडदरवाडी, ता. बारामती) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकऱ्याचे निंबूत येथील गट क्रमांक ८६/२ मध्ये सहा गुंठे क्षेत्रफळाचे प्लॉट आहेत. भूमी अभिलेख विभागामार्फत या प्लॉटची मोजणी करून फाळणीप्रमाणे कागदपत्रे तयार करण्यात आली होती. त्यानुसार फाळणी केलेल्या चार प्लॉटची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी बारामती तहसीलदारांनी निंबूत येथील तलाठी कार्यालयाला ११ फेब्रुवारी २०२६ रोजी आदेश दिले होते.


त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी तक्रारदार नोंदीबाबत चौकशी करण्यासाठी निंबूत येथील तलाठी कार्यालयात गेले असता तेथे उपस्थित असलेल्या सोमनाथ महानवर याने तलाठी व मंडल अधिकाऱ्यांच्या नावाने प्रत्येक प्लॉटसाठी ५ हजार रुपये अशी एकूण २० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली.


या तक्रारीनंतर एसीबीने २६ फेब्रुवारी रोजी लाच मागणीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ४ मार्च रोजी संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास निरा–बारामती रस्त्यावरील निंबूत खंडोबाची वाडी परिसरात इंडियन ऑइल पंपाजवळ एसीबीने सापळा रचला. यावेळी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोमनाथ महानवर याला रंगेहाथ पकडण्यात आले.


दरम्यान, तपासात महानवर हा तलाठी कार्यालयातील अधिकृत कर्मचारी नसून खासगी व्यक्ती असल्याचेही स्पष्ट झाले. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


Post a Comment

0 Comments