बारामती, दि. ३
तांदुळवाडी येथील एलसी कंपनी लेक परिसरात प्रेमी युगलावर कोयत्याने हल्ला करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या तिघा आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २६ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ८.४० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी संतोष रायनवार (बदलेले नाव, वय २६, मूळ नागपूर, सध्या बारामती) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत तांदुळवाडी विमानतळ रोडलगत असलेल्या एलसी कंपनी लेक येथील मोकळ्या जागेत बसले होते. त्यावेळी तोंडाला मास्क व रुमाल बांधलेल्या तिघा इसमांनी त्यांच्या जवळ येत लोखंडी सत्तूर व कोयत्याचा धाक दाखवून पैशांची मागणी केली.
फिर्यादीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता एका आरोपीने त्यांच्या डाव्या पायावर कोयत्याने वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी जबरदस्तीने सुमारे २१ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (किंमत अंदाजे ३ लाख रुपये), चांदीची अंगठी (५ हजार रुपये), चांदीची चैन (१५ हजार रुपये), आणखी एक चांदीची अंगठी (२ हजार रुपये) तसेच २ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. ‘परत इकडे यायचे नाही’ अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०९(६), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे प्रसाद गणपत भोसले (वय २४), धैर्यशील प्रशांत आगवणे (वय १९) व कृष्णा नाना गाडेकर (वय २१, सर्व रा. तांदुळवाडी, ता. बारामती) यांना २८ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपींकडून लुटलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकाने केली.

0 Comments