. पुरंदर रिपोर्टर Live
निरा. प्रतिनिधी.
मित्रप्रेमाची एक हृदयस्पर्शी घटना मंगळवारी (ता. २४) समोर आली असून न्यायालयाच्या आवारातच एका वकिलाचे डोळे पाणावल्याची ही भावूक कहाणी सध्या पाडेगाव, नीरा व परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
गुळुंचे (ता. पुरंदर) येथील लेखक, कवी आणि सामाजिक समस्या विश्लेषक म्हणून परिचित असलेले डॉ. प्रविण जोशी यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी जाहीर झाली. या पदवीचे प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी ते विद्यापीठात गेले होते.
यापूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त निरा येथील विधिज्ञ ॲड. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना एक भेटवस्तू दिली होती. त्या भेटीवर “मित्रा, तुला लवकरात लवकर पीएच.डी. मिळू दे. पदवी मिळाल्यावर प्रमाणपत्र घेताना या पेनने स्वाक्षरी कर,” असा भावनिक संदेश लिहिला होता.
विशेष म्हणजे, ॲड. चव्हाण आणि डॉ. जोशी हे दोघे वर्गमित्र असून एकमेकांना प्रेमाने “काका” अशी हाक मारतात. या हटके संबोधनामुळे त्यांची मैत्री परिसरात वेगळीच ओळख निर्माण करून आहे.
प्रमाणपत्र स्वीकारताना डॉ. जोशी यांनी ती भेट आठवणीने सोबत घेतली. त्यांनी व्हिडिओ कॉल करून ॲड. चव्हाण यांच्यासमोरच भेट उघडली आणि त्या पेनने प्रमाणपत्र रजिस्टरवर स्वाक्षरी केली. हा क्षण पाहून न्यायालयाबाहेर उभ्या असलेल्या ॲड. चव्हाण यांचे डोळे पाणावले. मैत्रीतील दिलेला शब्द आणि त्याची जपलेली कदर यामुळे हा प्रसंग अधिकच भावूक ठरला असून सोशल मीडियावरही या अनोख्या मित्रप्रेमाची जोरदार चर्चा सुरू आहे.
दरम्यान, डॉ. प्रविण जोशी यांनी प्रदीर्घ संशोधन कार्य पूर्ण करून पीएच.डी. पदवी मिळवल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया.
“काकाने दिलेला पेन आणि त्यावर लिहिलेला संदेश माझ्यासाठी मोठी प्रेरणा होती. मित्राचा शब्द पूर्ण करण्याची संधी मिळाल्यावर त्या क्षणात त्यालाही सहभागी करून घेतले,” असे डॉ. प्रविण जोशी यांनी सांगितले.

0 Comments