Baramati| आर्थिक अडचणींवर मात करत जिद्दीच्या बळावर गाठले यश; निंबुतच्या वैष्णवी बनसोडेची BPTH पदवी संपादन..! ग्रामीण भागातील मुलींसाठी ठरली प्रेरणादायी…



सोमेश्वरनगर | प्रतिनिधी 

                     निंबुत (ता. बारामती) येथील कु. वैष्णवी ताईबाई रमेश बनसोडे हिने वैद्यकीय क्षेत्रातील B.P.T H (Bachelor of Physiotherapy) ही पदवी यशस्वीरित्या संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण निंबुत गावात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले .

आर्थिक व सामाजिक अडचणींवर मात करत वैष्णवीने आपल्या जिद्दीच्या आणि कठोर परिश्रमांच्या बळावर हे यश मिळवले. तिच्या यशामागे आई ताईबाई यांची प्रेरणा आणि वडील रमेश आण्णा दुर्धर आजारावर मात करत केलेले अथक कष्ट, त्याग आणि मुलीच्या शिक्षणासाठी केलेली अहोरात्र मेहनत मोलाची ठरली. आपल्या मुलीने मोठे व्हावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे, या स्वप्नासाठी त्यांनी कोणतीही कमतरता भासू दिली नाही.

वैष्णवीनेही चिकाटी, सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर आपल्या पालकांचे स्वप्न साकार करत ग्रामीण भागातील मुलींसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. “मोठी स्वप्नं पाहा आणि ती पूर्ण करा” हा संदेश तिच्या यशातून अधोरेखित झाला आहे.

या यशाचा गौरव करण्यासाठी आदर्श मिलिंद तरुण मंडळ निंबूत यांच्या वतीने तिचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक व विचारवंत संभाजी गायकवाड  यांनी उपस्थित राहून  मार्गदर्शन केले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व आणि जिद्दीची गरज यावर मोलाचे विचार मांडले.

तसेच या प्रसंगी वीर योद्धा प्रतिष्ठानचे बापूसाहेब ढावरे, निवृत्त PSI हुंबरे, माजी सरपंच राजकुमार बनसोडे, चंदू दादा बनसोडे, अशोक बनसोडे, प्रसाद सोनवणे, याचबरोबर गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ महिला भगिनी आदर्श मिलिंद तरुण मंडळाचे कार्यकर्ते  यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भिमराव  बनसोडे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अमोल बनसोडे यांनी  पार पाडले.

वैष्णवी बनसोडे हिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत असून, तिच्या पुढील आयुष्यासाठी आणि सेवाभावी कार्यासाठी सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

“जिद्द, परिश्रम आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल, तर कोणतीही अडचण मोठी नसते” — वैष्णवी बनसोडेचा प्रवास याचाच जिवंत पुरावा ठरतो.

Post a Comment

0 Comments