बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या बारामती पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काँग्रेसने उमेदवार देत ही शक्यता पूर्णतः फोल ठरवली आहे. काँग्रेसकडून ॲड. आकाश विजयराव मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, त्यामुळे निवडणुकीत आता चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.
आकाश मोरे हे माजी आमदार तसेच विधान परिषदेचे सदस्य राहिलेले विजयराव मोरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या कुटुंबाची स्थानिक पातळीवर मजबूत राजकीय पार्श्वभूमी असून, त्यामुळे त्यांना चांगली ओळख मिळाली आहे. विशेष म्हणजे, २०१४ साली आकाश मोरे यांनी काँग्रेसच्या ‘पंजा’ चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांना निवडणुकीचा अनुभव असून काँग्रेसने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
दरम्यान, या पोटनिवडणुकीत केवळ काँग्रेसच नव्हे तर इतर इच्छुक उमेदवारांनीही अर्ज दाखल करत स्पर्धा अधिक चुरशीची केली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि अभिजीत बिचुकले यांनीही उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे बारामतीची निवडणूक आता बिनविरोध होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट निर्माण होऊन निवडणूक निर्विरोध होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र काँग्रेसच्या निर्णयामुळे बारामतीत आता थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या काळात प्रचाराचा जोर वाढणार असून, मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.


0 Comments