सोमेश्वरनगर. प्रतिनिधी.
बारामती तालुक्यातील चौधरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी लहान विद्यार्थ्यांचे चारचाकी वाहनातून आगमन करून त्यांचे ढोल-ताशा व लेझीमच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शुक्रवार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना टोपी, फुगे व गुलाबपुष्प देऊन त्यांचे औक्षण करण्यात आले. तसेच शाळेतील पहिले पाऊल ठशांच्या स्वरूपात उमटवून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.
याच वेळी इयत्ता चौथीतून पुढे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभही पार पडला. विद्यार्थ्यांसाठी मिसळपाव, व्हेज पुलाव व जिलेबी असा स्वादिष्ट अल्पोपहारही देण्यात आला.
या कार्यक्रमाला चौधरवाडीचे सरपंच शशांक पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पापळ,सुनीता बालगुडे व शारदा खामकर यांनी केले. या अभिनव उपक्रमाचे नियोजन पाहून उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.


0 Comments