बारामती। गोरक्षणाला पाठिंबा ; गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्याची बारामती मुस्लिम समाजाची मागणी


पुरंदर रिपोर्टर Live

बारामती. प्रतिनिधी.  

             बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) तसेच बारामती शहर पोलीस निरीक्षक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या गोहत्या बंदी, गोतस्करी प्रतिबंध आणि गोसंरक्षण संदर्भातील कायद्यांना बारामती मुस्लिम समाजाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

            निवेदनामध्ये हिंदू समाजाच्या श्रद्धेचा विषय असलेल्या गोमातेला “राष्ट्रीय पशू” घोषित करण्याची मागणी करण्यात आली. तसेच गोवंश संरक्षणाच्या अनुषंगाने शेतकरी व पशुपालकांच्या अडचणींकडेही लक्ष वेधण्यात आले.



            निरुपयोगी अथवा पालन करणे अशक्य झालेल्या गायींसाठी शासनाने आर्थिक मोबदला द्यावा, गोपालनासाठी प्रतिदिन अनुदान सुरू करावे, तसेच गोशाळांची संपूर्ण जबाबदारी शासनाने स्वीकारावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

              यासोबतच गोसंरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेणाऱ्या व मॉब लिंचिंगसारख्या घटनांना कारणीभूत ठरणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.

              गोवंश संरक्षणासोबतच कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्ये जपली जावीत, अशी भूमिका बारामती मुस्लिम समाजाच्या वतीने यावेळी मांडण्यात आली.

              या निवेदनावर मुस्लिम समाजातील विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments