प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मृणाली जाधव यांना इलेक्ट्रॉनिक सायन्समध्ये पीएचडी.


पुरंदर रिपोर्टर.  Live. 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी.   

            सोमेश्वरनगर येथील पुण्यातील म.ए.सो., आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागात संशोधक म्हणून कार्यरत असलेल्या मृणाली भानुदास चव्हाण (सध्या डॉ. मृणाली नामदेव जाधव) यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘इलेक्ट्रॉनिक सायन्स’ या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी मिळविलेल्या या यशामुळे सोमेश्वर परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

            त्यांनी "Design and Development of an Electronic System for the Detection of Pesticide Residue on Edible Fruits" या विषयावर संशोधन केले आहे. खाद्य फळांमधील कीटकनाशकांचे अवशेष शोधण्यासाठी इलेक्ट्रॉनिक प्रणाली विकसित करण्यावर आधारित हे संशोधन असून त्यावर आधारित शोधनिबंध विविध सायंटिफिक जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. तसेच या संशोधनास पेटंटही मंजूर झाले आहे.



          या संशोधनासाठी त्यांना डॉ. दीपा रमाने (उपप्राचार्या, सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स, पुणे), इमेरिटस प्रा. डॉ. अरविंद शाळीग्राम (सीईओ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रिसर्च पार्क फाउंडेशन) तसेच डॉ. तुकाराम डोंगळे (सहाय्यक प्राध्यापक, स्कूल ऑफ नॅनो सायन्स अ‍ॅण्ड बायोटेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. रजनीश कामत (कुलगुरू, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई) यांचे विशेष सहकार्य लाभले.

              मृणाली यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स विषयातील सेट (SET) परीक्षा उत्तीर्ण केली होती. तसेच २०२१ मध्ये यूजीसी नेट (NET) परीक्षेतही यश मिळवले. पुणे विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेश प्रक्रियेत (PET) यश मिळवून त्यांची संशोधक विद्यार्थी म्हणून निवड झाली होती.

             मृणाली या केवळ दोन वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या आईने मोठ्या जिद्दीने त्यांचा सांभाळ केला. आर्थिक परिस्थिती मर्यादित असतानाही शिक्षणाची जिद्द त्यांनी कायम ठेवली. इंजिनिअरिंगची आवड असूनही परिस्थितीमुळे त्यांनी बीएससीला प्रवेश घेतला. एमएससीसाठी पुणे आणि शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत नाव आले होते, मात्र आर्थिक अडचणींमुळे त्यांनी शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेतला.

           २०१३ मध्ये वाघळवाडी येथील नामदेव जाधव यांच्याशी विवाह झाल्यानंतरही त्यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. संसार, नोकरी, अभ्यास आणि संशोधन अशा सर्व जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला. पतीची खंबीर साथ, कुटुंबाचे सहकार्य आणि मुलगी राजवर्धिनीचा संयम यामुळे त्यांचा ‘मृणाली मंगल भानुदास चव्हाण ते डॉ. मृणाली नामदेव जाधव’ हा प्रेरणादायी प्रवास यशस्वी झाला.

            शिक्षण हेच खरे सोनं मानत साधी राहणी स्वीकारून त्यांनी शिक्षण आणि संशोधनालाच प्राधान्य दिले. प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या यशामुळे सोमेश्वर परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments