धर्माबाद प्रतिनिधी सोमेश स्वामी
गोसेवा हीच ईश्वरसेवा मानत धर्माबाद येथील धर्मप्रेमी व दानशूर व्यक्तिमत्त्व भवरीलाल जगदीशप्रसाद इनानी यांच्या परिवारातर्फे श्री सिद्धेश्वर गोवत्स गोशाळा, धर्माबाद येथे गोमातांच्या सेवेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी पॅलेट गोळी निर्मिती मशीन व भरडा मशीन दान स्वरूपात समर्पित करण्यात आली. अधिक मास (पुरुषोत्तम मास) निमित्त करण्यात आलेल्या या सेवाभावी कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
श्री सिद्धेश्वर गोवत्स गोशाळेमध्ये सध्या २५० हून अधिक गोवंशाचे संगोपन करण्यात येत असून, गावातील दानशूर नागरिकांच्या सहकार्याने गोमातांचे पालन-पोषण केले जाते. शिवदासीमाई यांच्या मार्गदर्शनाखाली गोवत्स परिवाराकडून गोशाळेचे व्यवस्थापन करण्यात येत असून, गोमातांना पोषक व दर्जेदार आहार मिळावा यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत.
गोमातांना अधिक पौष्टिक व पूरक खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी विविध कडधान्ययुक्त धान्याचे भरड करून त्यापासून पौष्टिक पॅलेट गोळ्या तयार करण्यासाठी ही आधुनिक मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मशीनच्या माध्यमातून तयार होणारे पशुखाद्य गोवंशाच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरणार असून, त्यामुळे त्यांच्या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
विशेष म्हणजे, यापूर्वीही इनानी परिवाराने गोशाळेला शेणापासून गोकाष्ठ (लाकूड) तयार करणारी मशीन भेट दिली होती. त्या मशीनच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गोकाष्ठ निर्मिती होत असून त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तसेच या उपक्रमामुळे गोशाळेला आर्थिकदृष्ट्याही सहाय्य मिळत आहे. गोसंवर्धन आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर समन्वय या माध्यमातून साधला जात आहे.
धर्माबादमधील विविध धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांमध्ये इनानी परिवार सातत्याने सक्रिय सहभाग घेत असून, त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे समाजात त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे.
या प्रेरणादायी कार्याबद्दल श्री सिद्धेश्वर गोवत्स गोशाळा परिवाराने इनानी परिवाराचे आभार व्यक्त करत समाजातील इतर दानशूर व्यक्तींनीही गोसेवा व धर्मकार्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.

0 Comments