सोमेश्वरनगर | प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गळीत हंगामातील खोडकी बिल १०० रुपये प्रति मे.टन व दुसरा हप्ता २०० रुपये प्रति मे.टन, असे एकूण ३०० रुपये प्रति मे.टन सभासदांच्या बँक खात्यावर तात्काळ जमा करावेत, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सोमेश्वर कारखान्याने सन २०२५-२६ गळीत हंगामासाठी एफआरपीची पहिली उचल ३३०० रुपये प्रति मे.टन सभासदांच्या खात्यावर वर्ग केली आहे. मात्र गाळप हंगाम संपून अडीच महिने उलटूनही खोडकी बिल व दुसरा हप्ता जाहीर करण्यात आलेला नाही.
चालू हंगामात कारखान्याने १२ लाख ९८ हजार ५५९ मे.टन उसाचे गाळप केले असून १५ लाख ५५ हजार ६५० साखरपोती उत्पादन केले आहे. तसेच चांगला साखर उतारा, मोठ्या प्रमाणात वीज विक्री आणि उपपदार्थ उत्पादनामुळे कारखान्याची आर्थिक स्थिती सक्षम असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
माळेगाव साखर कारखान्याने सन २०२५-२६ हंगामासाठी २०० रुपये प्रति मे.टन खोडकी बिल जाहीर केले असून, त्यापेक्षा सोमेश्वर कारखान्याची आर्थिक परिस्थिती अधिक भक्कम असल्याचे काकडे यांनी नमूद केले. मागील काही वर्षांत उत्कृष्ट कार्यक्षमता, उच्चांकी गाळप, साखर उत्पादन व वीज निर्मितीसाठी कारखान्याला विविध पुरस्कारही मिळाले आहेत.
सध्या सभासद शेतकऱ्यांना शेती मशागतीची कामे, ऊस लागवड, खते खरेदी तसेच मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे कारखान्याने सभासदांचा विचार करून दि. १२ जून २०२६ पूर्वी खोडकी बिल व दुसरा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी शेतकरी कृती समितीने केली आहे.
मागील काही वर्षांपासून हंगामानंतर दिले जाणारे खोडकी बिल बंद करण्यात आल्याने ही मागणी करावी लागत असल्याची खंतही सतीश काकडे यांनी व्यक्त केली.


0 Comments