निरा प्रतिनिधी :
निराशिवतक्रार येथे हरिप्रिया नाट्यकला संस्था यांच्या वतीने मे महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या संस्कार शिबिराचा समारोप सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह संस्कारक्षम पिढी घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नीरा शिवतक्रार प्राथमिक शाळेचे जीवन निंबाळकर उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणेवाडी येथील भारत ज्ञान विज्ञान संस्थेच्या बारामती शाखेचे सचिव नौशाद बागवान होते. त्यांनी मुलांना बडबडगीते शिकवून त्यांचा उत्साह वाढविला.
शिबिरात विद्यार्थ्यांना दररोज गणेश स्तुती, शुभंकरोती, रामरक्षा, मनाचे श्लोक, मारुती स्तोत्र यांचे पठण शिकवून सुसंस्कारांची बीजे रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासोबतच नाटक, गाणी, भाषण, अभिनय आणि नृत्य यांसारख्या कलागुणांचे प्रशिक्षण देण्यात आले.
विद्यार्थ्यांना आपल्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वारशाची ओळख व्हावी यासाठी थोर साहित्यिक साने गुरुजी, प्र. के. अत्रे, व. पु. काळे, बहिणाबाई चौधरी, ग. दि. माडगूळकर, कुसुमाग्रज यांच्यासह अनेक कवी-कवयित्रींची माहिती देण्यात आली. तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारकांच्या कार्याचीही विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली.
स्वातंत्रवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराष्ट्रातील संत-महंत यांनी स्वप्नात पाहिलेला आदर्श महाराष्ट्र घडविण्यासाठी बालपणापासूनच संस्कारांची पायाभरणी आवश्यक असल्याचे कामतकर दांपत्य यांनी यावेळी सांगितले.
शिबिरामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होत असल्याचे मत पालकांनी व्यक्त करत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद कामतकर यांनी केले, तर प्रस्तावना नम्रता कामतकर यांनी मांडली. आभार प्रदर्शन रूपाली चव्हाण यांनी केले.
या कार्यक्रमास राठी सर, घुले सर, शुभम रापर्ती, सचिन देशमुख, राजेंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.


0 Comments