बारामती प्रतिनिधी.
बारामती तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षाला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने काँग्रेस पक्षाने महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. बारामती शहर काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी वीरधवल गाडे तर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी वैभव बुरुंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. पक्षाच्या 'संघटन सुजन अभियाना' अंतर्गत निरीक्षकांनी बारामती दौरा करून स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा केली होती. त्यांच्या अहवालाच्या आधारे या नियुक्त्यांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.
या नियुक्त्यांमुळे बारामतीतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्या नेतृत्वामुळे पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
नियुक्तीनंतर बोलताना वीरधवल गाडे आणि वैभव बुरुंगले यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. "देश आणि राज्यात भ्रष्टाचार वाढला असून युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सरकारच्या धोरणांविरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. भाजपचा खरा चेहरा आणि त्यांचा भ्रष्टाचार घराघरांत पोहोचविण्याचे काम आम्ही करणार आहोत," असे त्यांनी सांगितले.
तसेच युवक, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून लढा उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि बारामती तालुक्यात काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह आमदार विश्वजीत कदम, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष लहू निवंगुने, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार, महाराष्ट्र प्रदेश सचिव आकाश मोरे आणि ज्येष्ठ नेते अशोक इंगुले यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीत पक्षाचे काम अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
"पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडत बारामतीत काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," अशी ग्वाही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिली.



0 Comments