सोमेश्वरनगर | रमेश कदम
सोमेश्वरनगर येथील कृष्णाली अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा यशाची परंपरा कायम राखत राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अभ्यासिकेचे विद्यार्थी विशाल गणेश बामणे (रा. वाणेवाडी) आणि अक्षय प्रकाश ठोंबरे (रा. लोणी भापकर) यांची SRPF ग्रुप क्र. २, पुणे येथे निवड झाली आहे.
कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या बळावर या दोन्ही विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या यशामुळे पालक, शिक्षक तसेच संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील युवकांसमोर त्यांनी प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.
कृष्णाली अभ्यासिकेमार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा तयारी आणि पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेले सर्वांगीण प्रशिक्षण दिले जाते. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत यश मिळवले असून विशाल बामणे आणि अक्षय ठोंबरे यांच्या निवडीमुळे अभ्यासिकेच्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा कृष्णाली फाउंडेशन आणि कृष्णाली अभ्यासिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दोघांच्या पुढील उज्ज्वल कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत, "विद्यार्थ्यांचे यश हेच आमच्या संस्थेचे खरे यश असून ग्रामीण भागातील युवकांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत," असे मत व्यक्त केले.
दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

0 Comments