Veer । वीर धरणातून नीरा नदीपात्रात आज पाणी सोडणार;नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; पूरपात्रात जाणे टाळण्याचे आवाहन


पुरंदर रिपोर्टर Live 

फलटण। प्रतिनिधी 

            नीरा खोऱ्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वीर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, धरणातून मंगळवार (दि. ८) रोजी येत्या ४ ते ५ तासात कधीही  नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 



            देवघर, भाटघर व गुंजवणी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. मंगळवार सकाळी धरणाची पातळी ५८७.७५मीटर इतकी असून धरणात ८.२२ टीएमसी (८७.३७ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नदीपात्रात नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. 

           धरण प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नीरा नदीपात्रात उतरू नये, जनावरे नदीकाठी नेऊ नयेत तसेच कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता रा. पो. मोरे यांनी केले आहे.

           प्रशासनाने संबंधित महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि पाटबंधारे विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या असून, नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments