Someshwarnagar । सोमेश्वरच्या रणधुमाळीपूर्वी युगेंद्र पवारांचा पश्चिम भागात कार्यकर्त्यांशी संवाद ; मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष.


पुरंदर रिपोर्टर Live. 

रमेश कदम.  

          सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार बुधवार (दि. २९) रोजी बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. निंबुत येथील युगवीर गार्डन येथे होणाऱ्या या मेळाव्याकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

           आगामी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तसेच पश्चिम भागातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत संघटनात्मक बांधणी, निवडणुकीची रणनीती आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. युगेंद्र पवार कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून आगामी राजकीय वाटचालीचे संकेत देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




           नुकत्याच मुरूम येथे झालेल्या पक्षाच्या जाहीर प्रवेश कार्यक्रमाला पश्चिम भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे या भागात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे संघटन बळकट होत असल्याची चर्चा सुरू असून, आगामी निवडणुकांमध्ये पक्ष अधिक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

          विशेषतः सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची नेमकी भूमिका काय असणार, कोणती रणनीती आखली जाणार आणि स्थानिक राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होणार, याबाबत सभासद आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

           बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी या दौऱ्याची माहिती देत पश्चिम भागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments