धर्माबाद । सोमेश स्वामी
धर्माबाद पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी कार्यरत असलेले रविराज दत्तात्रय क्षीरसागर यांची बदली झाल्याने तालुक्यातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, शेतकरी व विविध सामाजिक संघटनांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या जागी करण हैबते यांनी नूतन गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला असून, त्यांच्या स्वागताबरोबरच आगामी कार्यकाळाबाबत आशावाद व्यक्त केला जात आहे.
रविराज क्षीरसागर यांनी आपल्या कार्यकाळात लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत व नियमानुसार मार्गी लावणे, शेतकरी, महिला बचत गट, ग्रामपंचायती तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना त्वरित न्याय मिळवून देणे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाशी त्यांनी सौजन्यपूर्ण व संवेदनशील संवाद साधत विश्वासार्ह प्रशासनाची प्रतिमा निर्माण केली.
त्यांच्या कार्यकाळात पंचायत समितीच्या कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि गतिमानता आली. अनेक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, विकासकामांना दिलेली गती आणि जनतेशी ठेवलेला थेट संवाद यामुळे त्यांनी धर्माबाद तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे त्यांच्या बदलीची माहिती समोर आल्यानंतर विविध स्तरातून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले असून पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, नूतन गटविकास अधिकारी करण हैबते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर , तालुक्यातील विकासकामांना अधिक वेग मिळेल, आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल व नागरिकाभिमुख प्रशासन अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
धर्माबाद तालुक्यातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी करण हैबते यांचे स्वागत करत यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच रविराज दत्तात्रय क्षीरसागर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

0 Comments