सोमेश्वरनगर। रमेश कदम.
बारामती कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत निंबुत येथे शुक्रवार (दि. ३) रोजी कृषी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात आयोजित स्वागत समारंभात विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत आधुनिक शेती, ग्रामविकास आणि कृषी जनजागृतीचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वतःचा परिचय करून देत RAWE उपक्रमामागील उद्दिष्टे स्पष्ट केली. आगामी काळात गावात वास्तव्यास राहून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देणे, कृषीविषयक प्रात्यक्षिके, जनजागृती मोहीम तसेच ग्रामविकासाशी निगडित विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कृषी दिनाचे महत्त्व अधोरेखित करत ग्रामस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले.
यावेळी बारामती कृषी महाविद्यालयाचे खेती बचाव अभियान मार्गदर्शक संतोष गोडसे, एआय मार्गदर्शक आकाश वळकुंडे, तसेच कृषी सहाय्यक अधिकारी ज्योती गडाख यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित आधुनिक शेती, ऊस, केळी व पालेभाजी पिकांतील तंत्रज्ञानाचा वापर, बदलते कृषी तंत्र आणि भविष्यातील संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थित शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तन्वी मोरे, अनन्या हापसे, जानवी डोळस, सुवर्णा लोखंडे, राजकुवर राजे भोसले, गायत्री जाधव आणि दिशा फडतरे या विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास उपसरपंच अमर काकडे, विजयराव काकडे, माजी सरपंच राजकुमार बनसोडे, संभाजी काकडे, विलास काकडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे, कुसुम काकडे, प्रमोद बनसोडे, अजय काकडे, प्रवीण काकडे, लघुउद्योजिका स्वाती काकडे, विविध बचत गटांच्या महिला, आशा सेविका, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण शेतीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळणार असून शेतकऱ्यांनाही आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व मार्गदर्शन उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



0 Comments