Nira । माती परीक्षण शेतीच्या आरोग्याचा आरसा; कृषीकन्यांचे नीरा-शिवतक्रार येथे प्रात्यक्षिकातून जनजागरण

 


पुरंदर रिपोर्टर Live 

नीरा ; प्रतिनिधी :

             ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय , बारामतीच्या कृषीकन्यांनी नीरा-शिवतक्रार येथे माती परीक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजन करून शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणाबाबत जनजागृती केली. शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी माती परीक्षणाचे महत्त्व यावेळी सविस्तरपणे सांगण्यात आले.

           कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी, रासायनिक खते देण्यापूर्वी अथवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा आणि माती परीक्षणाच्या अहवालानुसार खत व्यवस्थापन करावे, असा सल्ला दिला. तसेच शेतातील मातीचे नमुने शास्त्रीय पद्धतीने कसे गोळा करावेत, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही करून दाखविण्यात आले.



          यावेळी माती परीक्षणामुळे जमिनीतील पोषक घटकांची उपलब्धता, कमतरता, जमिनीचा सामू (pH), मातीचा प्रकार आणि सुपीकतेची माहिती मिळते. त्यानुसार खतांचा योग्य वापर केल्यास अपव्यय टाळता येतो, उत्पादनात वाढ होते आणि जमिनीसाठी योग्य पिकांची निवड करणे सुलभ होते, अशी माहिती देण्यात आली. "माणसाप्रमाणे मातीही आजारी पडते; त्यामुळे तिची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे," असा संदेश कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना दिला.

           या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे, उपप्राचार्य एस. पी. गायकवाड, प्रा. समीर बुरुंगले, प्रा. पल्लवी पाटील आणि प्रा. आरती भोईटे यांचे मार्गदर्शन लाभले.

          कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन कृषीकन्या पूजा भागवत, साक्षी गायकवाड, मानसी गाजरे, वैष्णवी जाधव, प्रियांका काळे, आकांक्षा मदने आणि स्वप्नाली पुजारी यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. विद्यार्थिनींनी गावात प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

Post a Comment

0 Comments