सासवड, प्रतिनिधी :
पुरंदर तालुक्यातील तरटीमळा (ता. पुरंदर) येथे वडिलोपार्जित शेतजमिनीच्या मालकीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. काठ्या, खोऱ्याचा दांडा आणि विटांनी झालेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले असून, या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीकांत चंद्रकांत जगताप, त्यांचे भाऊ कृष्णकांत व श्रीकांत यांच्या मालकीची तरटीमळा येथील गट क्रमांक ९७/२६ व ९७/९ मधील सुमारे २९ गुंठे वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीच्या मालकीबाबत न्यायालयात दावा प्रलंबित असून, संबंधित जमिनीत सध्या मक्याचे पीक घेण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी लक्ष्मीकांत जगताप हे पत्नी जयश्री व मुलगा अभिषेक यांच्यासह शेतात गवत काढण्यासाठी गेले असता, आरोपींकडून त्यांना अडवून शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद वाढत गेला आणि त्याचे रूप हाणामारीत बदलले.
फिर्यादीनुसार, आरोपींनी काठ्या, लोखंडी खोऱ्याचा दांडा तसेच विटांचा वापर करून लक्ष्मीकांत जगताप, कृष्णकांत जगताप, संध्या जगताप, मनिषा जगताप आणि अन्य सदस्यांवर हल्ला केला. या मारहाणीत संध्या जगताप यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून इतरांनाही हात, पाय व पाठीवर मार लागल्याने ते जखमी झाले.
या प्रकरणी सुभाष गणपत जगताप, कुणाल सुरेश जगताप, रणजित सुरेश जगताप, सुधाकर गणपत जगताप आणि सुभाष जगताप यांच्या मोठ्या मुलाविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत असून, न्यायालयात प्रलंबित असलेल्या जमिनीच्या वादातून ही हिंसक घटना घडल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



0 Comments