Pune । पुणे जिल्हा पंचायत समिती सभापती असोसिएशनच्या अध्यक्षपदी कैलास काळे; उपाध्यक्षपदी युवराज काकडे, सचिवपदी किरण तावरे

 

लोणी काळभोर, (पुणे) :

           पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुणे जिल्हा पंचायत समिती सभापती असोसिएशनच्या अध्यक्षपदी आंबेगावचे कैलास बुवा काळे, उपाध्यक्षपदी हवेलीचे युवराज हिरामण काकडे आणि सचिवपदी बारामतीचे किरण तावरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.



          जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांच्या पंचायत समिती सभापतींनी सहभाग घेतला. पंचायत समित्यांचे अधिकार, रखडलेला विकासनिधी, विकासकामांतील अडचणी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांसमोरील विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करून संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.



           निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची भेट घेऊन पंचायत समित्यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासोबतही चर्चा करून विकासनिधी, प्रशासकीय अधिकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित विविध विषयांवर पाठपुरावा करण्याची भूमिका स्पष्ट केली.

           यावेळी अध्यक्ष कैलास काळे, उपाध्यक्ष युवराज काकडे आणि सचिव किरण तावरे यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा व राज्यस्तरावर प्रभावी पाठपुरावा केला जाणार आहे. आवश्यक निधी, अधिकार आणि विकासकामांना गती मिळावी यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार आहे.

            बैठकीस शिरूरच्या सभापती स्वातीताई घावटे, मावळच्या सुनीताताई येवले, भोरच्या मनीषाताई कंक, मुळशीच्या मंदाताई शेळके, राजगडच्या सुवर्णाताई राऊत, खेडच्या विद्याताई मोहिते, इंदापूरचे हर्षवर्धन लोंढे, पुरंदरचे अमित झेंडे यांच्यासह विविध तालुक्यांतील सभापती उपस्थित होते. सचिव किरण तावरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग नोंदविला.

Post a Comment

0 Comments