पुरंदर | पुणे–पंढरपूर पालखी महामार्गावर भीषण अपघात! रात्रीच्या वेळी उभ्या टँकरला दुचाकीची धडक;३८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

          


          नीरा : पुणे–पंढरपूर पालखी महामार्गावर उभ्या असलेल्या टँकरला दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पिसुर्टी गावच्या हद्दीत कामठवाडी स्मशानभूमीजवळ रविवारी (दि. ३०) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

या अपघातात अभिजीत भगवान निगडे (वय ३८, रा. गुळुंचे, ता. पुरंदर) यांचा मृत्यू झाला. अभिजीत निगडे हे दुचाकीवरून जेजुरीकडून नीरेकडे जात असताना पिसुर्टी गावच्या हद्दीतील पाटीलवाडा हॉटेलसमोर हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पालखी महामार्गावरील रस्त्याच्या डाव्या बाजूच्या दुचाकीच्या लेनमध्ये टँकर उभा करण्यात आला होता. रात्रीच्या वेळी वाहतुकीच्या मार्गात टँकर उभा असल्याचा अंदाज न आल्याने अभिजीत यांच्या दुचाकीची टँकरला पाठीमागून जोरदार धडक बसली.

या भीषण अपघातात अभिजीत निगडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान, वाहतुकीच्या लेनमध्ये टँकर उभा केल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात येत असून, टँकर चालकाच्या निष्काळजीपणामुळे तरुणाला जीव गमवावा लागल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात फेटल मोटार अपघात रजिस्टर क्रमांक ०९/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे.

महामार्गावर उभ्या असलेल्या टँकरच्या मागे किंवा पुढे इतर वाहनांना तो दिसावा यासाठी आवश्यक सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली होती का? तसेच टँकर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभा करण्यात आला होता का? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप करीत आहेत.


Post a Comment

0 Comments