भोर, प्रतिनिधी
भोर तालुक्यातील भोंगवली गावच्या हद्दीतील दत्त मंदिरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीचे आई-वडील, वर, वराचे आई-वडील, एका नातेवाईकासह विवाह लावून देणाऱ्या पुजाऱ्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोंगवली (ता. भोर, जि. पुणे) येथील दत्त मंदिरात १२ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास हा विवाह पार पडल्याचा आरोप आहे. संबंधित मुलगी सोनाली संतोष घाडगे (वय १६, रा. उदमाईवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) ही अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिचा विवाह ऋषभ बबन कुरूमकर (रा. वागदरी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याच्याशी लावण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या बालविवाहात मुलीचे वडील संतोष बबन घाडगे व आई रूपाली संतोष घाडगे यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. तसेच मुलाचे वडील बबन दौलता कुरूमकर, आई सीमा बबन कुरूमकर, निलेश शिवाजी घाडगे आणि हिंदू रितीरिवाजानुसार विवाह लावून देणारा, मात्र ज्याचे नाव व पत्ता अद्याप निष्पन्न झालेला नाही, अशा पुजाऱ्याविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी शैला गंगाराम आटोळे यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना मे महिन्यात घडली असली तरी या प्रकरणाची पोलीस ठाण्यात २२ ऑगस्ट रोजी नोंद करण्यात आली. अल्पवयीन मुलीचा विवाह कोणत्या परिस्थितीत झाला, या विवाहासाठी नेमका कोणाचा पुढाकार होता तसेच या प्रकरणात अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करीत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड करीत असून, प्रभारी पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. बालविवाहासारख्या गंभीर सामाजिक प्रथेविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे भोर तालुक्यात खळबळ उडाली आहे.


0 Comments