सोमेश्वरनगर । रमेश कदम
महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त संजय कोलते (भा.प्र.से.) यांची श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी पुणे येथील साखर आयुक्तालयाच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी कारखान्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत कारखान्याचे कामकाज, ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न, आगामी ऊस गाळप हंगाम तसेच साखर उद्योगासमोरील विविध अडचणी व आव्हानांबाबत विचारविनिमय करण्यात आला. साखर उद्योगाच्या विकासासाठी आणि कारखान्याची कार्यक्षमता अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विविध उपाययोजनांवरही चर्चा झाली.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत कारखाना आणि शेतकरी या दोन्ही घटकांच्या सर्वांगीण हिताच्या दृष्टीने आवश्यक बाबींवर सकारात्मक चर्चा झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या नियोजनासह उद्योगासमोरील विविध प्रश्नांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष किसन तांबे, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक तसेच संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.


0 Comments