बारामती रमेश कदम.
पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन चायनीज मांजा नागरिकांसह पक्ष्यांच्या जीवितासाठी धोकादायक ठरत असल्याने बारामती पोलिसांनी त्याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. नायलॉन चायनीज मांजाची विक्री, साठवणूक किंवा वापर करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
बारामती पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, नायलॉन चायनीज मांजा तसेच जीवितास धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या मांज्याचा वापर करू नये. या मांजामुळे दुचाकीस्वार, पादचारी, लहान मुले तसेच पक्ष्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता असते.
शहर व परिसरात अशा धोकादायक मांजाची विक्री किंवा साठवणूक होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने बारामती पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सतर्क असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित पतंगोत्सवासाठी नायलॉन चायनीज मांजाचा वापर पूर्णपणे टाळावा, असे आवाहन बारामती पोलिसांनी केले आहे.


0 Comments