Nira । स्मार्ट मीटरच्या नावाखाली वीजबिलांची ' चक्री ' ग्राहकांच्या खिशाला महावितरणचा फटका ? ५ सप्टेंबरपर्यंत निर्णयाची मागणी; अन्यथा ?.

पुरंदर रिपोर्टर Live

निरा  प्रतिनिधी.  

           निरा परिसरात स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांना वाढीव वीजबिलांचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अवाजवी वीजबिले, विविध कर व अधिभार तसेच बिल दुरुस्तीच्या प्रश्नावरून ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी असून, याबाबत महावितरणच्या निरा शाखा कार्यालयाकडे निवेदन देण्यात आले.



ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ग्राहकांना पूर्वकल्पना व आवश्यक माहिती न देता घरगुती वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीजबिलांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप करत, सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. स्मार्ट मीटरबाबत संपूर्ण माहिती देऊन प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

वीजबिलामध्ये प्रत्यक्ष युनिट वापराव्यतिरिक्त आकारण्यात येणारे कर, अधिभार व इतर शुल्क यांचा सविस्तर लेखी तपशील ग्राहकांना देण्यात यावा. तसेच मागील महिन्यातील वीज वापर, युनिटनुसार आकारणी आणि विविध करांचा स्पष्ट हिशोब उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी वाढीव व अवाजवी वीजबिले तातडीने दुरुस्त करून ग्राहकांना दिलासा द्यावा, बिल दुरुस्ती होईपर्यंत कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडू नये, तसेच स्मार्ट मीटर बसविण्याबाबत ग्राहकांना संपूर्ण माहिती द्यावी, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत.

महावितरणच्या प्रशासकीय विभागाने ग्रामस्थांच्या सर्व मागण्यांवर ५ सप्टेंबर २०२६ पर्यंत योग्य व ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत निर्णय न झाल्यास ८ सप्टेंबर रोजी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

आंदोलनादरम्यान रस्ता रोको आंदोलन होण्याची शक्यता असून, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. परिस्थिती चिघळल्यास त्याची जबाबदारी महावितरणच्या प्रशासकीय विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

निवेदन देताना निरा-जेजुरी पोलीस ठाण्याचे पीएसआय संतोष मदने, रविराज कोकरे,वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे पीएसआय दीपक वारुळे तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. निवेदन स्वीकारताना महावितरणचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी तुळशीराम जगताप, सचिन मोरे, संतोष मोहिते, महेश जेधे, अकबर सय्यद, अमोल साबळे, सुधीर शहा, मंगेश ढमाळ, अरविंद जेधे, चंद्रशेखर पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या


  • स्मार्ट मीटर बसविण्याबाबत ग्राहकांना संपूर्ण माहिती व पारदर्शकता द्यावी.
  • वाढीव व अवाजवी वीजबिले तातडीने दुरुस्त करावीत.
  • कर, अधिभार व इतर आकारणीचा सविस्तर तपशील ग्राहकांना द्यावा.
  • मागील महिन्यातील युनिट वापर व बिल आकारणीचा लेखी हिशोब उपलब्ध करून द्यावा.
  • बिल दुरुस्ती होईपर्यंत कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडू नये.

Post a Comment

0 Comments