सोमेश्वरनगर:रमेश कदम
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या हंगामातील उसाचा अंतिम दर जाहीर केला असून, गतवर्षीच्या उसाला ३,८०० रुपये दर देण्यात आला आहे. यामध्ये फेब्रुवारी महिन्यात तुटलेल्या उसाला अनुदानासह ३,९०० रुपये तर मार्च महिन्यात तुटलेल्या उसाला तब्बल ४,००० रुपये प्रतिटन असा अंतिम दर बसला आहे. हा दर संपूर्ण राज्यात सर्वाधिक असल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली आहे.
गेल्या वर्षीच्या उसाला सोमेश्वर कारखान्याची एफआरपी (FRP) ३,२८५ रुपये असताना कारखान्याने सभासदांना टनाला ३,३०० रुपये एकरकमी पहिली उचल दिली होती. यानंतर फेब्रुवारीत तुटलेल्या उसाला टनाला १०० रुपये आणि मार्चमध्ये तुटलेल्या उसाला २०० रुपये अतिरिक्त अनुदान देण्यात आले होते. आता हे सर्व अनुदान व अंतिम हप्ता गृहीत धरल्यास मार्चमधील उसाचा दर ४,००० रुपयांवर पोहोचला आहे.
हा महत्त्वपूर्ण निर्णय आज (दि. १४) सोमेश्वर कारखान्याच्या 'जिजाऊ सभागृहात' पार पडलेल्या संचालक मंडळाच्या मासिक सभेत घेण्यात आला.
या बैठकीस कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष किसन तांबे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक संग्राम सोरटे,राजवर्धन शिंदे, सुनील भगत, मिलिंद कांबळे, ऋषी गायकवाड, लक्ष्मण गोफणे, अभिजीत काकडे, शैलेश रासकर, प्रणिता खोमणे, जितेंद्र निगडे, अनंत तांबे, तुषार माहुरकर आणि सचिव कालिदास निकम यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

0 Comments