पुरंदर | पुरंदर तहसील कार्यालयात लाचेचा पर्दाफाश; २५ हजारांची लाच स्वीकारताना क्लार्क एसीबीच्या जाळ्यात



सासवड : वडिलोपार्जित जमिनीच्या प्रकरणातील आदेश लवकर मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुरंदर तहसील कार्यालयात काम करणाऱ्या एका क्लार्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पुणे युनिटने रंगेहाथ पकडले. विजय मल्हारी खळदकर (वय ५७, रा. कुंभारवळण, ता. पुरंदर) असे कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीच्या असमान हिस्स्याबाबतचे प्रकरण पुरंदर तहसीलदारांच्या न्यायालयात सुरू होते. या प्रकरणाची सुनावणी २४ जून रोजी पूर्ण झाली होती. दोन्ही बाजूंना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, प्रकरणाचा आदेश अद्याप देण्यात आलेला नव्हता.

आदेशाबाबत माहिती घेण्यासाठी तक्रारदार २९ ऑगस्ट रोजी पुरंदर तहसील कार्यालयात गेले असता त्यांची भेट विजय खळदकर यांच्याशी झाली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, प्रकरण तहसीलदारांसमोर ठेवण्यासाठी सुरुवातीला ५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली.

यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने २ सप्टेंबर रोजी तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी संबंधित प्रकरणाचा आदेश तहसीलदारांकडून लवकर मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर एसीबीच्या पुणे युनिटने सापळा रचला. पंचांसमक्ष २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना खळदकर यांना सासवड येथील तहसील कार्यालयासमोरील रोहित हॉटेलजवळ रंगेहाथ पकडण्यात आले.

या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अविनाश घरबुडे यांनी केले. पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा पथकात पोलीस हवालदार बाळासाहेब गदादे, पोलीस हवालदार दीपक काकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल रवी दिवेकर यांचा समावेश होता.

दरम्यान, तपासात विजय खळदकर हे शासकीय कर्मचारी नसून संबंधित कार्यालयात काम करणारी खासगी व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७(अ) अंतर्गत सासवड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

लाच मागितली जात असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments