बारामती । खंडोबाचीवाडीत जय दुर्गामाता नवतरुण मंडळ व श्रीदत्त मित्र मंडळाचा साधेपणाचा निर्णय, ‘हीच दादांना खरी श्रद्धांजली’ म्हणत बाप्पाचे स्वागत.


पुरंदर रिपोर्टर Live. 

सोमेश्वरनगर  रमेश कदम.  

            दरवर्षी डीजेचा दणदणाट, ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि मोठ्या उत्साहात होणारे गणपती बाप्पाचे आगमन… मात्र यंदा खंडोबाच्या वाडीत या उत्साहाला विराम देत जय दुर्गा नवतरुण मंडळ आणि व श्री दत्त मंडळाने अत्यंत साध्या व शांत वातावरणात गणरायाचे स्वागत केले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. न डीजे, न ढोल-ताशे, न गुलाल आणि कोणताही जल्लोष न करता शांततेत गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली.




मंडप परिसरात अजितदादांना श्रद्धांजली वाहणारा भावनिक बॅनरही लावण्यात आला होता. “नाव तुमचं ओठांवर, आठवण तुमची मनात; विसरणार नाही तुम्हाला आम्ही…” या भावनिक संदेशाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अजितदादांच्या आठवणींनी वातावरण भावुक झाले होते.

विशेष म्हणजे, खंडोबाच्या वाडीचे माजी सरपंच अंकुश बाप्पू लकडे यांचेही काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते. त्यामुळे अजितदादा पवार आणि अंकुश लकडे या दोघांच्या स्मृतींना अभिवादन करणारा भावनिक संदेश मंडळाच्या वतीने देण्यात आला. गावासाठी अंकुश लकडे यांनी केलेले कार्य आणि महाराष्ट्रासाठी अजितदादा पवार यांनी केलेले योगदान यांची आठवण यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार तसेच सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. “अजितदादांना श्रद्धांजली म्हणून यावर्षी कोणताही डीजे, ढोल-ताशे किंवा इतर कोणताही जल्लोष करणार नाही. बाप्पाचे आगमन जसे साधेपणाने केले, तसेच विसर्जनही साध्या पद्धतीने करण्यात येईल,” असे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘पुरंदर बारामती रिपोर्टर Live’शी बोलताना सांगितले.

“दादांनी महाराष्ट्रासाठी आणि बाप्पूंनी गावासाठी केलेल्या कार्याची आठवण ठेवणे, हीच त्यांना आमच्या मंडळाच्या वतीने खरी श्रद्धांजली आहे,” अशी भावनिक भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

यामुळे दरवर्षी जल्लोषात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा खंडोबाच्या वाडीत शांतता, साधेपणा आणि श्रद्धेने साजरा होताना पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या आगमनावेळी जल्लोषाऐवजी दिसून आलेली ही भावनिक शांतता उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली.

Post a Comment

0 Comments