बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी गावच्या मुख्य चौकात भरदिवसा एका तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात अमोल सदाशिव जाधव हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काऱ्हाटी गावातील मुख्य चौकात अमोल जाधव याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर, हातावर तसेच शरीराच्या अन्य भागांवर वार केल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमोल जाधव याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला पुण्यात हलविण्यात आल्याची माहिती आहे.
हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. काऱ्हाटी येथील ऋतिक आणि ओमकार या दोघांवर हल्ला केल्याचा संशय व्यक्त होत असून, या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी बारामती तालुक्यातील विविध ठिकाणी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे बारामती तालुक्यातील वाढत्या कोयता हल्ल्यांच्या घटनांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनेतील आरोपींची भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

0 Comments