बारामती । निंबूतच्या शेतशिवारात चोरट्यांचा धुमाकूळ; तीन विद्युत पंपांच्या केबल लंपास


पुरंदर रिपोर्टर Live

निंबूत | प्रतिनिधी


       निंबूत परिसरात अस्मानी संकटामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आता विद्युत केबल चोरीच्या घटनांनी भर पडली आहे.  मधुकर बनसोडे, प्रमोद बनसोडे, दीपक बनसोडे या तीन शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांच्या केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांसमोर शेतीला पाणी देण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.


          निंबूत परिसरात गेल्या काही वर्षांपासून विद्युत मोटार पंप तसेच केबल चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. विद्युत केबल चोरीला गेल्यानंतर पुन्हा नवीन केबल, वायर व अन्य विद्युत साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. आधीच वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला मिळणारे दर आणि नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर चोरीचे नवे संकट उभे राहिले आहे.

*पूर्वी पोलिसांच्या प्रयत्नांना यश*

यापूर्वी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तसेच करंजे पूल पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांनी विद्युत पंप व केबल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यावेळी काही चोरीच्या घटनांचा तपास करून संशयितांची माहिती निष्पन्न करण्यात आली होती. काही गुन्हे उघडकीस आल्याने संबंधित शेतकऱ्यांना दिलासाही मिळाला होता.

मात्र, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पुन्हा विद्युत केबल व साहित्य चोरीच्या घटना वाढत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन सखोल तपास करावा, अशी मागणी होत आहे.

*चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी*

यापूर्वीच्या चोरीच्या प्रकरणांचा तपास आणि त्यातील आरोपींच्या हालचालींची माहिती घेऊन सध्याच्या घटनांचा माग काढावा. तसेच चोरीला गेलेले विद्युत साहित्य शोधून संबंधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीचा वीजपुरवठा आणि सिंचन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी विद्युत केबल व पंप चोरीच्या घटनांना आळा घालणे गरजेचे असून, रात्रीच्या वेळी शेतशिवारात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments