पुरंदर । बारामतीहून दहीहंडी पहायला पुण्यात निघाले, दिवे घाटात नियंत्रण सुटल्याने बाईक घसरली, खाली पडताच भरधाव वाहनाने उडवले; तरुणाचा जागीच मृत्यू


पुरंदर रिपोर्टर Live

पुरंदर प्रतिनिधी

           दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी बारामतीहून पुण्याकडे दुचाकीवरून निघालेल्या तीन तरुणांचा दिवे घाटात भीषण अपघात झाला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यावर घसरली. त्यानंतर मागून आलेल्या भरधाव वाहनाच्या चाकाखाली एक तरुण आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोन तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही तरुण दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने जात होते. दिवे घाटातील रस्त्यावर दुचाकी घसरून तिघेही खाली पडले. त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव वाहनाच्या चाकाखाली एक तरुण आला आणि या दुर्घटनेत त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.



या अपघातातील मृत तरुणाची ओळख गौरव चव्हाण (वय १८, रा. आमराई, बारामती) अशी झाली आहे. तर अन्य दोन तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दुर्दैवी घटनेमुळे बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी उत्साहाने पुण्याकडे निघालेल्या तरुणांवर काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

दिवे घाटासारख्या धोकादायक वळणांच्या मार्गावर वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे, हेल्मेटचा वापर करणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे या अपघाताने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

Post a Comment

0 Comments