धक्कादायक! महिला पोलिसाकडून विद्यार्थ्याचे दप्तर व मोबाईल चोरी; सीसीटीव्हीत संपूर्ण प्रकार कैद!



                     पुरंदर रिपोर्टर live 

बारामती :प्रतिनिधी 

             पोलीस खात्यावर विश्वास असतानाच महिला पोलिस कर्मचाऱ्याचाच चोरीतील सहभाग उघड झाल्याने बारामतीत एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्याचे दप्तर आणि मोबाईल चोरण्याच्या प्रकरणी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे.


या प्रकरणी राजेंद्र जगन्नाथ हगवणे (रा. माळेगाव, ता. बारामती) या विद्यार्थ्याने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजेंद्र आणि त्याचा मित्र मयूर बाळासाहेब वायकर हे दोघे २९ मे रोजी परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात गेले होते. त्यांनी आपले मोबाईल फोन दप्तरात ठेवले आणि परीक्षा देण्यासाठी वर्गात गेले. मात्र परीक्षा संपल्यानंतर दप्तर आणि मोबाईल गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.


त्यानंतर त्यांनी तात्काळ प्राचार्यांना माहिती दिली. प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. फुटेजमध्ये आकांक्षा विजय गाढवे (रा. बारामती) या महिलेने दप्तर उचलून नेतानाचा व्हिडिओ स्पष्टपणे दिसून आला.


राजेंद्र हगवणे यांनी आकांक्षा गाढवे यांच्याशी संपर्क साधून मोबाईल आणि दप्तराची मागणी केली. मात्र गाढवे यांनी नाकारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकांक्षा गाढवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 पोलीस खात्यातील व्यक्तीनेच अशाप्रकारे वर्तन केल्याने सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


Post a Comment

0 Comments