राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवा नेते ओंकार हजारे यांचा मृतदेह कारमध्ये आढळला; आत्महत्येचा संशय?


                         पुरंदर रिपोर्टर Live 
 

सोलापूर | ९ जून २०२५

                          राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे सोलापूर शहरातील सरचिटणीस ओंकार महादेव हजारे (वय ३२, रा. पापय्या तालीम परिसर, मुरारजी पेठ) यांचा मृतदेह रविवारी रात्री घरासमोर उभ्या असलेल्या कारमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात येत असून, सोलापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.


रविवारी दुपारी ओंकार हजारे आपल्या घरासमोरील कारमध्ये जाऊन बसले होते. काही तास उलटल्यानंतरही ते बाहेर न आल्याने घरच्यांना आणि शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी कारमध्ये पाहिलं असता, ओंकार कारच्या सीटवर निपचित पडलेले दिसून आले. दरवाजा बंद असल्याने तो तोडून त्यांना बाहेर काढण्यात आलं. तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.


ओंकार हजारे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सक्रिय आणि प्रभावशाली युवा नेते होते. त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतलेल्या हजारे यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांत, मित्रपरिवारात आणि पक्षात शोककळा पसरली आहे.


सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हायचं आहे. ओंकार हजारे यांनी आत्महत्या केली की अपघात किंवा इतर कोणते कारण होते, हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.


हजारे यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्याबद्दल श्रद्धांजली व्यक्त केली असून, त्यांच्या जाण्याने एक उदयोन्मुख राजकीय नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments