BARAMATI | पवार कुटुंबाचा पाडवा उत्सव रद्द; काय आहे यामागचं कारण?



 बारामती : प्रतिनिधी 

                             दरवर्षी मोठ्या उत्साहात पवार कुटुंब बारामतीत दिवाळी सण साजरा करत असते. या सणाच्या निमित्ताने पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात आणि बारामतीतील गोविंद बाग राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरते. मात्र, यावर्षी पवार कुटुंबीयांकडे दिवाळी पाडवा साजरा होणार नाही. कारण शरद पवार यांचे बंधू आणि ‘सकाळ’ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती प्रतापराव पवार यांचं अलिकडेच निधन झालं आहे. त्यामुळे या वर्षी पवार कुटुंबाने दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.


                        शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीयांनी एकमताने दिवाळी सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून बारामतीत पवारांचा दिवाळी पाडवा हा मोठ्या जल्लोषात साजरा होत असतो. या पाडव्याला राज्यभरातून राजकीय नेते, आमदार, खासदार तसेच विविध जिल्ह्यांतील नागरिक पवारांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत दाखल होत असतात.

खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वीच माध्यमांशी बोलताना “या वर्षी पाडवा साजरा होईल की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही” अशी साशंकता व्यक्त केली होती. अखेर भारती पवार यांच्या निधनामुळे सण साजरा न करण्याचा निर्णय अधिकृतरित्या घेण्यात आला आहे.

गेल्या वर्षी पवारांचा दिवाळी पाडवा राजकीय वर्तुळात विशेष चर्चेत आला होता. कारण पक्ष आणि कुटुंबातील फूटीनंतर प्रथमच पाडव्याचे दोन वेगळे कार्यक्रम पाहायला मिळाले होते. शरद पवार यांचा पाडवा बारामतीतील गोविंद बागेत साजरा झाला होता, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाडवा काटेवाडीत पार पडला होता. या दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थकांनी गर्दी केली होती.

मात्र, यावर्षीचा पाडवा शांततेत आणि साधेपणात जाईल. भारती पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीयांनी कुटुंबातील दुःख लक्षात घेऊन दिवाळी पाडव्याचे उत्सवाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बारामतीत दरवर्षी दिसणारा पाडव्याचा जल्लोष यंदा दिसणार नाही.

Post a Comment

0 Comments