Baramati | जमिनीच्या वादातून तरुणाचे अपहरण व बेदम मारहाण; चार जणांना अटक


      पुरंदर रिपोर्टर Live 

 सोमेश्वरनगर | प्रतिनिधी.  

                   वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतून एका तरुणास स्विफ्ट कारमध्ये जबरदस्तीने बसवून अज्ञात ठिकाणी नेऊन बेदम मारहाण केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप गोरख होळकर (रा. सदोबाचीवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांना दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास वडगाव निंबाळकर येथील हॉटेल इंडिया बार अ‍ॅण्ड परमिट रूम येथून जमिनीच्या वादातून आरोपी तेजस उर्फ बंटी हनुमंत होळकर व त्याच्या तीन साथीदारांनी जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसवून नेले.

आरोपींनी फिर्यादीस अज्ञात ठिकाणी, कॅनॉलच्या कडेला असलेल्या उसाच्या शेतात नेऊन लाकडी दांडक्याने मारहाण केली. या वेळी फरार आरोपी शंभू दादासो कारंडे यास व्हिडीओ कॉल करून मारहाणीचा थेट व्हिडीओ दाखवण्यात आला. तसेच “आमच्या नादाला लागलात तर जिवे मारू,” अशी धमकीही देण्यात आली.



यानंतर आरोपींनी फिर्यादीस दारू पाजून होळ (ता. बारामती) येथे आणून सोडून दिले व आरोपी फरार झाले. या प्रकरणी फिर्यादी संदीप होळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान आरोपी तेजस उर्फ बंटी हनुमंत होळकर यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यासह

साहील लक्ष्मण गायकवाड (वय २२, रा. मुरूम, ता. फलटण, जि. सातारा),

संकेत नामदेव भिसे (वय २२, रा. होळ, ता. बारामती, जि. पुणे),

सनी संदीप सकट (वय २३, रा. आनंदनगर, सस्तेवाडी, ता. बारामती, जि. पुणे)

यांना अटक करण्यात आली आहे.



    आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार (एम.एच. १४ जी वाय २२००) व लाकडी दांडके जप्त करण्यात आली आहेत. तसेच हॉटेल इंडिया बार अ‍ॅण्ड परमिट रूम येथील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अटक आरोपींना  न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. नागनाथ पाटील करीत असून अधिकचा तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments