ग्रामीण भागातील तरुण खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील क्रीडा कौशल्याला चालना मिळावी आणि संघभावना, शिस्त व नेतृत्वगुण विकसित व्हावेत या उदात्त हेतूने बुवासाहेब हुंबरे मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. उद्घाटन सोहळ्याला परिसरातील क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ आणि खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यंदा या स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग नोंदवला असून विविध गावांतील खेळाडू आपल्या खेळाची चुणूक दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस करंजे व परिसरात क्रिकेटचा थरार, उत्साह आणि स्पर्धात्मक वातावरण पहायला मिळणार आहे.
या भव्य क्रिकेट पर्वाचे उद्घाटन नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष संग्राम सोरटे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कदम, राष्ट्रवादी माजी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पुणे जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती प्रमोद काकडे, माजी पुणे जिल्हा परिवहन विभाग प्रमुख रमाकांत गायकवाड, सोमेश्वरचे संचालक ऋषी गायकवाड, सरपंच वैभव गायकवाड, माणिक काळे, सरपंच सुनील ढोले, सुचिता साळवे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब शिंदे, सुखदेव शिंदे, माऊली केंजळे, प्रताप गायकवाड, नितीन शेंडकर अशोक होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
उद्घाटनप्रसंगी मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत खेळामुळे तरुणांमध्ये शिस्त, संयम, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात असे प्रतिपादन केले. ग्रामीण भागातील युवकांनी खेळाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे व व्यसनांपासून दूर राहून क्रीडा क्षेत्रात प्रगती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या स्पर्धेचे संयोजन किरण शेंडकर, भाऊसो हुंबरे, जितू सकुंडे, नितीन साखरे, मयूर शेंडकर आणि पापा मुलानी यांनी केले असून, संपूर्ण आयोजनाची जबाबदारी बुवासाहेब हुंबरे मित्रपरिवार यांनी सांभाळली आहे.
एकूणच, हे क्रिकेट पर्व केवळ खेळापुरते मर्यादित न राहता ग्रामीण युवकांच्या एकत्रित सहभागातून सामाजिक सलोखा, मैत्री आणि क्रीडासंस्कृती वृद्धिंगत करणारे ठरणार असून, पुढील काही दिवस परिसरात क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.

0 Comments