Breaking News | पुरंदरचा लेखक सुनील पांडे यांचा साहित्यिक ठसा, बिहारची युवा गायिका आमदार मैथिली ठाकूर यांच्यावरच मराठीत प्रथमच पुस्तक. सोशल मीडियावरही मोठा प्रतिसाद.

                              पुरंदर रिपोर्टर - LIVE 

विजय लकडे

                   निरा (ता. पुरंदर) येथील सुप्रसिद्ध लेखक सुनील पांडे यांनी लोकप्रिय युवा गायिका मैथिली ठाकूर यांच्यावर लिहिलेल्या “लोकप्रिय युवा गायिका मैथिली ठाकूर” या पुस्तकाची महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक मैथिली ठाकूर यांच्यावर प्रकाशित झालेले पहिलेच पुस्तक असून ते मराठी भाषेत प्रकाशित झाले आहे. त्यामुळे साहित्यिक, सांस्कृतिक व संगीत क्षेत्रात या पुस्तकाकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे.

मैथिली ठाकूर या नव्या पिढीतील अत्यंत लोकप्रिय आणि आश्वासक गायिका असून लोकसंगीत व भक्तिगीतांमुळे त्या घराघरात पोहोचल्या आहेत. मराठी अभंग, लोकगीते आणि भक्तिगीते गाऊन त्यांनी महाराष्ट्रातील रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी, मैथिली, भोजपुरी, उर्दू, पंजाबी, तमिळ, इंग्रजी अशा विविध भाषांतील गायनामुळे देश-विदेशात त्यांचे कोट्यवधी चाहते आहेत.



दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी हडपसर मतदारसंघाचे आमदार मा. योगेश अण्णा टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कोंढवा महोत्सवानिमित्त मैथिली ठाकूर पुण्यात उपस्थित होत्या. यावेळी लेखक सुनील पांडे यांनी त्यांच्यावर लिहिलेले हे पुस्तक मैथिली ठाकूर यांना भेट दिले. स्वतःवर लिहिलेले पहिले पुस्तक मराठीत असल्याचे पाहून मैथिली ठाकूर भारावून गेल्या.

मैथिली ठाकूर यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त करताना हा आपल्या आयुष्यातील “सौभाग्याचा क्षण” असल्याचे सांगितले. “महाराष्ट्रातील लोकांनी माझ्यावर नेहमीच प्रेम केले. माझे पहिले पुस्तक मराठीत आणि तेही महाराष्ट्रात प्रकाशित झाले, हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे,” असे त्यांनी नमूद केले. मराठी माणसांच्या प्रेमामुळे भविष्यात कोंढवा परिसरात राहण्याची इच्छा असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

मैथिली ठाकूर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पुस्तक भेटीच्या व्हिडिओला साठ लाखांहून अधिक व्ह्यूज, सहा लाखांपेक्षा जास्त लाईक्स आणि हजारो शेअर्स मिळाले आहेत. त्यामुळे हे पुस्तक आणि लेखक सुनील पांडे यांचे कार्य राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहे.



या पुस्तकासाठी मैथिली ठाकूर यांनी लेखक सुनील पांडे यांचे विशेष आभार मानले आहेत. सुनील पांडे हे पुणे महानगरपालिकेत कार्यरत असून त्यांच्या या साहित्यिक कामगिरीचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच बिहारमधूनही कौतुक होत आहे. बुकगंगा या नामवंत प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले असून, निरेच्या लेखकाने केलेली ही कामगिरी संपूर्ण पुरंदर तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे.

निरेच्या लेखकाची कमाल अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत असून, सुनील पांडे यांचे हे पुस्तक मराठी साहित्यविश्वात एक महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे.

Post a Comment

0 Comments