पुरंदर रिपोर्टर लाईव्ह.
निरा. प्रतिनिधी.
निरा (ता पुरंदर) येथील तसेच पुणे शहरातील व्यापारी व सामाजिक क्षेत्रात परिचित असलेले ज्येष्ठ उद्योजक, हॉटेल व्यावसायिक आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व विठ्ठल शेट्टी यांचे १ जानेवारी २०२६ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने निरा गावासह पुण्यातील व्यापारी व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विठ्ठल शेठ यांनी सुरुवातीला निरेत ‘दुर्गा भुवन’ या नावाने हॉटेल व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर पुणे मार्केट यार्ड परिसरात ‘साहिल’ या नावाने हॉटेल व्यवसाय सुरू करून त्यांनी अल्पावधीतच दर्जा, चव आणि माणुसकीच्या सेवेमुळे मोठा नावलौकिक मिळवला. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत हॉटेलमधील प्रत्येक छोट्या–मोठ्या गोष्टीकडे त्यांचे बारकाईने लक्ष असायचे, हे त्यांच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य होते.
पुण्यात स्थायिक होऊन मोठा व्यवसाय उभारला असला तरी निरा गावाशी असलेली नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही. ग्रामदैवत महालक्ष्मी आईच्या दर्शनाला ते कधीही चुकत नसत. पुण्यातील मार्केट यार्ड येथील हॉटेलमुळे निरा परिसरातील व्यापारी किंवा ओळखीचा कोणीही व्यक्ती आला, तर त्यांची आवर्जून प्रेमाने विचारपूस करणे, चहा–नाश्ता व जेवण करूनच निरोप देणे, हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळेच ते सर्वांच्या मनात घर करून राहिले.
विठ्ठल शेठ हे खऱ्या अर्थाने अजातशत्रू होते. त्यांच्या या संस्कारांचा वारसा पुढे नेत त्यांचे चिरंजीव हरिष शेठ व्यवसायासोबतच सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात सक्रिय वाटचाल करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली तसेच उच्च शिक्षित नातवंडे असा मोठा परिवार आहे. हरित शेट्टी हे निरा विकास आघाडीचे अध्यक्ष असून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत.
विठ्ठल शेठ यांच्या निधनाने एक कर्तृत्ववान उद्योजक, सेवाभावी हृदयाचे व्यक्तिमत्त्व आणि माणुसकी जपणारा मार्गदर्शक हरपल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

0 Comments