बारामती | बारामतीचा ऐतिहासिक योगायोग: भारतातील पहिली महिला सरपंच ते महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री.


                         पुरंदर रिपोर्टर-Live 

विजय लकडे.  

                  महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक पर्व सुरू झाले असून, राज्याला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये सुनेत्रा अजित पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या घटनेमुळे महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

विशेष म्हणजे, महिलाराजाची ही संकल्पना नवी नसून, तिची मुहूर्तमेढ तब्बल १९६३ साली बारामती तालुक्यातील निंबूत गावात रोवली गेली होती. आजपासून सुमारे ६३ वर्षांपूर्वी, जेव्हा राजकारणावर पुरुषांचेच वर्चस्व होते आणि महिलांचा सहभाग जवळपास शून्य होता, त्या काळात निंबूत ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णपणे महिलांच्या हाती देण्यात आला होता.

                        कै. सहकार महर्षी मुगुटराव काकडे आणि लोकनेते बाबालाल काकडे यांच्या दूरदृष्टीतून १९६३ साली झालेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत, कै. कमल बाबालाल काकडे यांनी निंबूतच्या सरपंचपदाची धुरा तब्बल पाच वर्षे सांभाळली. विशेष म्हणजे, केवळ सरपंचच नव्हे तर संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य देखील महिलांच होते. हा प्रयोग त्या काळात इतका क्रांतिकारक होता की, त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती आणि इतिहासात त्याची नोंद घेतली गेली आहे.

त्या काळात महिलांची ओळख ‘चूल आणि मूल’ इतकीच मर्यादित मानली जात होती. राजकारणात महिलांचा सहभाग नको, अशी सामाजिक मानसिकता असताना, काकडे परिवाराने सर्व बंधनांना छेद देत महिलांवर विश्वास ठेवून संपूर्ण ग्रामपंचायतीचा कारभार पाच वर्षे त्यांच्या हाती दिला. महिलांनी हा कारभार अत्यंत सक्षम, पारदर्शक आणि प्रभावीपणे सांभाळून दाखवला होता.

                                

                                आज आरक्षणामुळे महिलांचा राजकारणातील सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असला, तरी आरक्षणापूर्वीच महिलाराज प्रत्यक्षात आणणारे निंबूत गाव महाराष्ट्रात आदर्श ठरले आहे. आजपर्यंत महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री लाभलेल्या नसल्या, तरी सुनेत्रा पवार यांच्या रूपाने राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळाली आहे.

हा ऐतिहासिक क्षण पाहता, १९६३ साली निंबूतमध्ये झालेला महिलाराजाचा प्रयोग किती दूरदर्शी आणि क्रांतिकारक होता, याची पुन्हा एकदा जाणीव होते.

भारताची पहिली महिला सरपंच, महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री आणि महिलांच्या नेतृत्वाचा हा गौरवशाली प्रवास — याचा साक्षीदार बारामती तालुका ठरला आहे, हे विशेष.

Post a Comment

0 Comments