पुरंदर रिपोर्टर Live
वाठार | प्रतिनिधी
वाठार जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार जयश्री राजेंद्र भोसले या तब्बल चार हजार मतांच्या आघाडीने विजयी झाल्या असून त्यांच्या विजयामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्ते व समर्थकांकडून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
जयश्री भोसले या महिला ओबीसी प्रवर्गातील असल्याने आणि सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण महिला ओबीसीसाठी राखीव असल्यामुळे त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे.
निंबूत गावच्या कन्या असलेल्या जयश्री भोसले यांच्या विजयामुळे गावात अभिमानाचे वातावरण पसरले आहे. काकडे-दे. परिवारासह त्यांचे बंधू व निंबूत गावचे माजी उपसरपंच उदय काकडे, शिवाजी काकडे तसेच पत्रकार संभाजी काकडे यांच्या कुटुंबीयांसाठी हा क्षण अत्यंत गौरवास्पद ठरला आहे.
विजयाच्या आनंदानिमित्त गावाच्या प्रवेशद्वारावरील कमानीवर “निंबूतची कन्या, जिल्ह्याचा अभिमान” असा संदेश असलेला अभिनंदनाचा भव्य बॅनर लावण्यात आला असून ग्रामस्थांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हा विजय केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण परिसरासाठी अभिमानाचा ठरला असून आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments