पुरंदर | सुनील पांडे यांचे सुवर्ण महोत्सवी ५०वे पुस्तक ‘पत्रामागची गोष्ट’ प्रकाशित.


निरा : प्रतिनिधी 

                 पुरंदर तालुक्यातील निरा येथील सुप्रसिद्ध लेखक सुनील पांडे यांचे सुवर्ण महोत्सवी ५०वे पुस्तक ‘पत्रामागची गोष्ट’ नुकतेच प्रकाशित झाले. स्नेहवर्धन प्रकाशनाच्या प्रकाशिका डॉ. स्नेहल तावरे यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

             

               पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त करताना डॉ. स्नेहल तावरे म्हणाल्या, “सर्जनशीलतेचे साहित्यिक संचित म्हणजे ‘पत्रामागची गोष्ट’ हा ग्रंथ होय. विविध साहित्यिक, कलावंत, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांशी जपलेली पत्रमैत्री, त्यातून मिळालेले प्रेम, मार्गदर्शन आणि प्रेरणा यांचा हा चालता-बोलता इतिहास आहे. आज पोस्टाने पत्रव्यवहार करण्याची परंपरा जवळपास इतिहासजमा झाली असताना, त्या काळातील आत्मीयतेचा दस्तऐवज म्हणून हा ग्रंथ विशेष महत्त्वाचा ठरतो.”

महाविद्यालयीन जीवनात वाचनाची आवड जोपासणाऱ्या सुनील पांडे यांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून विविध क्षेत्रातील नामवंतांना पत्रे लिहिण्यास सुरुवात केली. अनेकांनी त्यांना तत्परतेने उत्तरे दिली, तर काहींनी उशिरा का होईना प्रतिसाद दिला. या पत्रमैत्रीतूनच त्यांचे अनेकांशी स्नेहबंध जुळले.

पुढे त्यांच्या कथा, लेख विविध मासिके व दिवाळी अंकांतून प्रसिद्ध होऊ लागले. त्यांचे लेखन वाचून अनेक साहित्यिकांनी त्यांना पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारे पत्रव्यवहारातून मिळालेल्या प्रेम, प्रेरणा आणि मार्गदर्शनाचा समृद्ध प्रवास त्यांनी ‘पत्रामागची गोष्ट’ या पुस्तकातून रसिकांसमोर मांडला आहे.

वयाच्या ४५व्या वर्षांपर्यंत जपलेली ही पत्रसंपदा म्हणजे त्यांच्या लेखन प्रवासाचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास प्रकाशिकेने व्यक्त केला.

सध्या सुनील पांडे हे पुणे महानगरपालिकेत कार्यरत असून त्यांच्या ५०व्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सुवर्ण महोत्सवी टप्पा गाठत साहित्यविश्वात नवा अध्याय लिहिणाऱ्या लेखक सुनील पांडे यांना हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments