Accident | काळजाचा ठोका चुकवणारी घटना! माजी मंत्र्यांच्या पुतण्याच्या कारला कंटेनरची जोरदार धडक…


भिगवन | प्रतिनिधि 

         सोलापूर–पुणे महामार्गावर भिगवन जवळ गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे व धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारला समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली.


ही घटना डाळज 2 गावाच्या हद्दीत रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघात इतका भीषण होता की कारच्या चालक बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून गाडीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.


सुदैवाने या अपघातात धनंजय सावंत यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही आणि ते थोडक्यात बचावले. मात्र कारचालक आणि सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, सावंत हे मुंबईतील पक्षप्रवेश कार्यक्रम आटोपून परंडा येथे परतत होते. दरम्यान, कंटेनरचा वेग जास्त असल्याने धडक तीव्र झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.


अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.


या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मोठी जीवितहानी टळल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


Post a Comment

0 Comments