अजित पवार यांच्या कथित विमान अपघात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. आमदार Rohit Pawar यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर या प्रकरणात पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्रात गुन्हा नोंदवला जात नसल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी थेट बंगलुरु गाठून तक्रार दाखल केली होती.
बेंगळुरू येथील हाय ग्राऊंड पोलीस ठाण्यात सोमवारी झिरो एफआयआर नोंदवण्यात आला. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, रोहित पवार यांनी दिलेल्या सविस्तर फिर्यादीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या झिरो एफआयआरमध्ये कोणत्याही एका व्यक्तीचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आलेले नाही, तर “सर्व संबंधित व्यक्ती” असा उल्लेख करण्यात आला आहे.
या प्रकरणात रोहित पवार यांनी 66 पानांची कागदपत्रे कर्नाटक पोलिसांकडे सादर केली आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील मरीन ड्राईव्ह आणि बारामती पोलीस ठाण्यात वारंवार मागणी करूनही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी कर्नाटकात जावे लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणाचा मुख्य मुद्दा म्हणजे तपासाची दिशा ठरली आहे. सध्या सीआयडीकडून या घटनेचा तपास अपघाती मृत्यू म्हणून केला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. मात्र, त्यांच्या तक्रारीत हा केवळ अपघात नसून “गुन्हेगारी षडयंत्र” असू शकतो, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा स्वतंत्र आणि सखोल गुन्हेगारी तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कर्नाटक पोलिसांनी नोंदवलेला हा झिरो एफआयआर आता महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे पाठवण्यात आला आहे. पुढील प्रक्रिया म्हणून महाराष्ट्रात गुन्हा नोंदवून तपास सुरू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरणही तापण्याची चिन्हे आहेत. एका बाजूला न्यायासाठी लढा देत असल्याचा दावा, तर दुसऱ्या बाजूला तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने, पुढील काही दिवसांत या प्रकरणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

0 Comments