बारामती | अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर मगरवाडीचा संवेदनशील निर्णय; संग्राम सोरटे यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ-जोगेश्वरी यात्रा साधेपणात..!




सोमेश्वरनगर, प्रतिनिधी -

               बारामती तालुक्यात सध्या यात्रा उत्सवांचा हंगाम सुरू असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाचे सावट अजूनही कायम आहे. या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील मगरवाडी ग्रामस्थांनी एक भावनिक आणि संवेदनशील निर्णय घेत, यंदाची श्री भैरवनाथ-जोगेश्वरी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.

गोविंदनगर, नाईकवाडी, कोंढाळकर वाडी, हगवणे मळा, येळे वस्ती आणि गायकवाड मळा या भागांतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला. नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष तसेच श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संग्राम  सोरटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी एकदिलाने हा ठराव मंजूर केला.

               मगरवाडीच्या विकासात अजितदादा पवार यांचे मोठे योगदान राहिले असून, त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होणे हीच खरी श्रद्धांजली असल्याची भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली.

यात्रेतील सर्व करमणुकीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, त्याऐवजी कीर्तन किंवा व्याख्यानाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, पारंपरिक धार्मिक विधी नेहमीप्रमाणे पार पडणार असून, यात्रेला साधेपणाची जोड देण्यात येणार आहे.

या बैठकीस गावातील तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक आणि सर्व वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहमतीने घेतलेल्या या निर्णयामुळे गावात एकात्मता आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडले असून, साध्या व धार्मिक वातावरणात यात्रा साजरी करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments