बारामती | सोमेश्वर साखर कारखान्यात उपाध्यक्षपदासाठी चर्चा; ‘शेवटची संधी’ कोणाच्या गळ्यात माळ?




सोमेश्वरनगर | विजय लकडे.  

                            राज्यात नावलौकिक मिळवलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी सध्या हालचाली सुरू असून, सभासदांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. विद्यमान उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांचा कार्यकाळ संपल्याने आता पुढील उपाध्यक्ष कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोमेश्वर कारखान्याची आगामी निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना, निवडणुकीपूर्वी मिळणारी ही उपाध्यक्षपदाची शेवटची संधी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारखान्याच्या राजकारणात ही निवड केवळ औपचारिक नसून, आगामी समीकरणांवर परिणाम करणारी मानली जात आहे.

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची  एकहाती सत्ता स्थापन झाल्यानंतर चेअरमनपदी पुरुषोत्तम जगताप यांची निवड झाली होती. त्याचवेळी उपाध्यक्षपदासाठी दरवर्षी एकाला संधी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्या निर्णयानुसार आनंदकुमार होळकर यांना पहिली संधी मिळाली. त्यानंतर प्रणिता खोमणे, तसेच पुरंदर तालुक्यातील बाळासाहेब कामथे यांनी उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली.

यानंतर नुकतीच ज्यांची संचालकपदी निवड झालेल्या मिलिंद कांबळे यांना ही उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. मात्र प्रक्रियेमधील विलंबामुळे काही पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ वाढला आणि त्यामुळे आता उर्वरित कालावधी मर्यादित राहिला आहे. परिणामी, पुढील उपाध्यक्षाला केवळ काही महिन्यांचा कार्यकाळ मिळणार असला तरीही या पदासाठी इच्छुकांची संख्या आणि चुरस मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

दरम्यान, अजितदादा पवार यांच्या निधनानंतर कारखान्याची सूत्रे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्याने अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उपाध्यक्षपद बारामती तालुक्यातच कायम राहणार की यावेळी पुरंदर तालुक्याला संधी मिळणार, याबाबतही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सोमेश्वर कारखान्याचे विस्तृत कार्यक्षेत्र आणि विविध गटांचे प्रतिनिधित्व लक्षात घेता, कोणत्या गावाला आणि कोणत्या गटाला ही संधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एकूणच, ‘शेवटची संधी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडीकडे सभासदांसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले असून, येणारे काही दिवस कारखान्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहेत.

Post a Comment

0 Comments