१३ वर्षांनंतर बारामती टी.सी. कॉलेज बी.कॉम बॅचचा जल्लोष. आठवणींना भावनिक उजाळा.

 

पुरंदर रिपोर्टर Live    

बारामती.  प्रतिनिधी.  

               तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथील बी.कॉम २०१२-२०१३ उत्तीर्ण बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल १३ वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला. हा गेट-टुगेदर कार्यक्रम आर्याबाग, काटेवाडी (ता. बारामती) येथे रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता.

         कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला अल्पपरिचय व मनोगत व्यक्त करत महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला.

         बी.कॉम पदवी घेतल्यानंतर प्रशासकीय अधिकारी, सीए, पत्रकार, पोलीस, वकील, व्यावसायिक, उद्योजक, शिक्षक, खेळाडू तसेच प्रगतशील बागायतदार अशा विविध क्षेत्रांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला ठसा उमटवणारे माजी विद्यार्थी यावेळी एकत्र आले होते. सुमारे १२५ ते १३० विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

            १३ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर सर्वजण एकत्र आल्याने वातावरणात आनंद, उत्साह आणि भावनिक रंग भरला होता. महाविद्यालयीन जीवनातील सांस्कृतिक कार्यक्रम, अभ्यासातील अनुभव, त्या काळातील किस्से आणि मैत्रीच्या आठवणींची मनमोकळी देवाणघेवाण झाली. अनेक वर्षांनी सगळे एवढे मनमुराद हसल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

            कार्यक्रमादरम्यान विविध मनोरंजनात्मक उपक्रम, खेळ तसेच चविष्ट स्नेहभोजनाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांनी आपल्या नोकरी, व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील प्रवासाविषयी माहिती देत एकमेकांना प्रेरणा दिली. भविष्यात समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्पही सर्वांनी यावेळी व्यक्त केला.

             या स्नेहमेळाव्याचे नियोजन माजी विद्यार्थ्यांच्या समितीमार्फत करण्यात आले होते. स्वाती ताम्हाणे आणि नितेश शर्मा यांनी पुढाकार घेत आयोजनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

शेवटी एकत्रित छायाचित्रण करत लवकरच पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments