ता. ९ :
गुळुंचे (ता. पुरंदर) येथील प्रविण जोशी यांनी प्रबोधन कालखंडाचा मराठी साहित्यावरील प्रभाव : कालखंड १८०० ते १९५० या प्रदीर्घ विषयावर संशोधन पूर्ण केले आहे. भारतीय प्रबोधन, इंग्लंड, अमेरिका, फ्रांस, रशिया येथील प्रबोधनाचा तब्बल १५० वर्षांच्या मराठी साहित्यावरील प्रभाव त्यांनी शोधला. यापूर्वी या विषयावर संशोधन झाले नसून साहित्य क्षेत्रात हे मौलिक संशोधन असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. त्यांच्या या संशोधनाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
प्रविण जोशी हे ग्रामीण लेखक व कवी असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. अडीच वर्षांपूर्वी त्यांची बदली होऊन ते पाडेगाव येथील शाळेत हजर झाले. शाळेचा ग्रामस्थांच्या व शाळा समितीच्या सहकार्याने कायापालट करत त्यांनी डिजिटल शाळा उभी केली. या शाळेत डिजिटल अभ्यासक्रम असून इंटरनेटच्या सहाय्याने विद्यार्थी शिकताना दिसतात. एक अभिनव उपक्रम म्हणून मुख्याध्यापक बापूराव गायकवाड व जोशी यांनी कृतीवर्गाची निर्मिती केली आहे.
दिवसभर नोकरी व पहाटे चार, पाच वाजेपर्यंत संशोधन असे कित्येक महिने त्यांनी काम केले. संशोधनाचा विस्तार अधिक असून मराठीतील पहिले छापील पुस्तक ते नंतरच्या दीडशे वर्षातील वैचारिक व ललित साहित्याच्या हजारो संदर्भग्रंथांचा अभ्यास जोशी यांनी केला. पाश्चात्य विचारवंत व त्यांच्या साहित्याने प्रबोधन कालखंडात झालेले बदल, क्रांत्या यांचा चिकित्सक अभ्यास करून अकराव्या शतकापासूनच्या भारतीय प्रबोधन घटनांचा आढावा त्यांनी संशोधनात घेतला आहे. वडगाव बुद्रुक येथील डॉ. वैजिनाथ राख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी पदवी पूर्ण केली. मौखिक परीक्षेसाठी बेळगाव येथील डॉ. चंद्रकांत वाघमारे, डॉ. वैजिनाथ राख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे होते. संशोधनासाठी डॉ. देविदास वायदंडे, डॉ. संदीप सांगळे, डॉ. सिद्धार्थ लांडे, डॉ. उमेश सिरसट, डॉ. कुंडलिक पारधी यांचे सहकार्य मिळाल्याचे जोशी यांनी सांगितले.
“संशोधनाचा विस्तार अधिक असल्याने ते पूर्णत्वाला नेण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागली. नोकरी, कुटुंब यांचा ताळमेळ घालत संशोधन पूर्णत्वाला नेऊ शकलो याचा आनंद आहे. प्रबोधन या विषयावरील अनेक नवीन तथ्यांना पुष्टी मिळाली आहे.” डॉ. प्रविण जोशी, संशोधक.

0 Comments