आईच्या कष्टांना मिळाले फळ; आदित्य सूर्यवंशी पीएसआय, निरेकरांकडून जंगी सत्कार.

.                        पुरंदर रिपोर्टर Live  

निरा.   प्रतिनिधी.  

              पुरंदर.   निरा येथील आदित्य संतोष सूर्यवंशी यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात आदित्य यांचा सत्कार करण्यात आला.

            या प्रसंगी निरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी यांच्या शुभहस्ते आदित्य सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दत्ताजी  चव्हाण यांनी भूषविले.

           कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामस्थांच्या वतीने माऊली गायकवाड यांच्या हस्ते आदित्य यांना फेटा बांधून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी, दत्ताजी चव्हाण तसेच ग्रामस्थांच्या वतीने आदित्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आदित्य यांच्या आईचाही विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश घुले  यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात आदित्य सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचा संघर्षमय प्रवास मांडत तरुण पिढीला प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

             या कार्यक्रमाचे आयोजक पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “मनात ठरवले तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे आदित्य सूर्यवंशी. वडिलांच्या निधनानंतर आईने मोठ्या कष्टाने त्याचे संगोपन केले आणि त्या कष्टाचे चीज आज झाले आहे. आदित्यच्या यशामुळे सूर्यवंशी कुटुंबाची तसेच गावाची मान उंचावली आहे.”

            सचिन मोरे यांनी संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करत आदित्य हा तरुण पिढीसाठी आदर्श असल्याचे सांगितले. तरुणांनी त्याचा आदर्श घेऊन परिश्रम व प्रामाणिकपणाने यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी अनिल चव्हाण, अजित सोनवणे, दयानंद चव्हाण, धर्मराज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत आदित्य यांना शुभेच्छा दिल्या.



              स्वतःच्या भाषणात आदित्य सूर्यवंशी म्हणाले, “आयुष्यात अनेक कष्ट आणि संघर्ष पाहिले. त्या सर्व कष्टांचे आज चीज झाले आहे. माझ्या आईच्या डोळ्यातील आनंद पाहून मला सर्वात जास्त समाधान वाटते. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. ध्येय निश्चित ठेवले तर यश नक्की मिळते.”

                 पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी यांनी आपल्या भाषणात आदित्यच्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत तरुणांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येतात; परंतु त्यावर मात करत पुढे जाणे महत्त्वाचे आहे. कितीही मोठे झालात तरी आपल्या गावाशी असलेली नाळ कधीही तुटू देऊ नका.”

             कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ताजी चव्हाण  यांनी आदित्यच्या जिद्दीचे कौतुक करत समाजात संस्कार व चांगली संगत किती महत्त्वाची आहे, यावर प्रभावी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन जगदीश घुले  यांनी केले, तर संग्राम पवार यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन पृथ्वीराज चव्हाण व मित्र परिवार यांनी केले होते.

                 या प्रसंगी अनेक मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या. आदित्य सूर्यवंशी यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत असून ग्रामस्थांनी आयोजित केलेला हा सत्कार समारंभ अत्यंत प्रेरणादायी ठरला.

Post a Comment

0 Comments