बारामती, प्रतिनिधी :
बारामती शहरात तब्बल ३४ लाखांहून अधिक रकमेच्या आर्थिक फसवणुकीचा भंडाफोड करत बारामती शहर पोलिसांनी ६ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. 314/2025 अन्वये दाखल असलेल्या या प्रकरणात दत्तात्रय पोपटराव खुळे (रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीने हॉटेल व्यवसायात व्यवस्थापक म्हणून काम करताना फिर्यादीचा विश्वास संपादन करून ग्राहकांची बनावट नावे नोंदवणे, उधारी दाखवणे तसेच आर्थिक व्यवहारात फेरफार करून 34,33,393 रुपयांचा अपहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, बारामती शहर पोलिसांनी तांत्रिक तपास, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढत त्याला शिताफीने अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत आणि त्यांच्या पथकाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
या धडाकेबाज कारवाईमुळे “कायद्याच्या कचाट्यातून गुन्हेगार सुटत नाही” हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे. दरम्यान, अपहार झालेली रक्कम आणि संबंधित पुरावे जप्त करण्याचे प्रयत्न सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांना आवाहन :
संशयास्पद हालचाली किंवा आर्थिक फसवणुकीची माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन बारामती शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे

0 Comments