धर्माबाद प्रतिनिधी. सोमेश स्वामी.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात गॅस व घरकुल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे सामान्य जनतेचे अक्षरशः हाल होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नागरिकांना आपला नंबर लागावा यासाठी रात्री २ वाजल्यापासूनच रांगेत उभे राहावे लागत आहे, तरीही सकाळपर्यंत त्यांना कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
स्थळी पाहणी केल्यास शेकडो नागरिकांची मोठी गर्दी दिसून येते. वृद्ध, महिला आणि मजूर वर्गातील नागरिक आपली रोजीरोटी सोडून तासन्तास रांगेत थांबलेले दिसतात. मात्र, प्रशासना कडून टोकन प्रणाली, बसण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा मूलभूत सुविधांचाही पूर्णतः अभाव आहे.
प्रशासनाकडून “सर्वांना सुविधा मिळेल” अशी आश्वासने दिली जात असताना, प्रत्यक्षात मात्र नियोजनाचा पूर्ण बोजवारा उडाल्याचे स्पष्टपणे जाणवते. नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होत असून, अनेकजण या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.“सुविधा मिळवण्यासाठी आलो, पण इथे तर शिक्षा भोगावी लागत आहे,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली.
सदर परिस्थिती ही केवळ गैरव्यवस्थेचे नव्हे, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण असल्याचे बोलले जात आहे. जर तात्काळ योग्य नियोजन करून व्यवस्था सुधारली नाही, तर येत्या काळात जनतेचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
जनतेची ठोस मागणी:
॰ तात्काळ टोकन प्रणाली लागू करावी
॰. वेगवेगळ्या दिवशी लाभार्थ्यांना बोलवावे
॰. पिण्याच्या पाण्याची व बसण्याची व्यवस्था करावी
॰. कर्मचारी संख्या वाढवून कामाचा वेग वाढवावा
“झोपलेल्या प्रशासनाने आता तरी जागे व्हावे; अन्यथा जनता आपल्या पद्धतीने उत्तर देईल!”


0 Comments